भूखंड क्रमांक १२३ वरील अतिक्रमणांवर नगरपरिषदेची कारवाई; आत्महत्येच्या धमकीनंतर पोलिसांना पाचारण, घरमालकांना स्वतःहून अतिक्रमण हटविण्याच्या सूचना…
अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर शहरातील भूखंड क्रमांक १२३ वरील अतिक्रमणांविरोधात नगरपरिषदेने कारवाई सुरू केली असून, जेसीबीच्या साहाय्याने सुमारे दहा टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत. त्यानंतर व्हाईट बिल्डिंगजवळील पक्क्या बांधकामांच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला. यावेळी एका व्यक्तीने आत्महत्येची धमकी दिल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. काही नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर संबंधित घरमालक आणि दुकानदारांना स्वतःहून अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नगरपरिषद प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून संबंधित दुकानदार, टपरीधारक आणि शेडधारकांना तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. काहींनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्याचे आश्वासन दिले; मात्र त्यानंतरही अतिक्रमणे हटविण्यात आली नसल्याने प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली. मुख्याधिकारी गणेश शिंदे आणि अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने सुमारे दहा टपऱ्या हटविल्या.
टपऱ्या हटविल्यानंतर व्हाईट बिल्डिंगजवळील पक्क्या बांधकामांचा प्रश्न उपस्थित झाला. संबंधित बांधकामे हटविण्याच्या प्रक्रियेदरम्यान एका व्यक्तीने पालिका कर्मचाऱ्यांना आत्महत्येची धमकी दिल्याची माहिती समोर आली. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर काही नगरसेवकांनी मध्यस्थी करून संबंधितांशी चर्चा केली. घरमालक आणि दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवून घ्यावीत, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
दरम्यान, भूखंड क्रमांक १२३ मधील अतिक्रमण हटविण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमणे न हटविल्यास पालिकेकडून ती हटविण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. कारवाईदरम्यान होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी संबंधित अतिक्रमणधारकांवर राहील, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या कारवाईत अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्यासह अविनाश बिन्हाडे, चंदू बिन्हाडे, राज रामराजे, जितेंद्र चावरीया, दर्शन बिन्हाडे, सुनील संघिले, विकास बिन्हाडे आणि विशाल सपकाळे यांच्यासह नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे भूखंड क्रमांक १२३ वरील बांधकामांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. टपऱ्यांवरील कारवाईनंतर पक्क्या बांधकामांबाबत प्रशासन कोणती पावले उचलते आणि संबंधितांना दिलेल्या सूचनांनंतर पुढील कारवाई कशी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
![]()

