बसस्थानकातील विकासकामांच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर बसस्थानकातील विकासकामांच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात करण्यात आले. आगारातील पेव्हर ब्लॉक व रंगरंगोटीच्या कामांसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, पुढील सहा महिन्यांत बसस्थानकाचे रूप पालटलेले असेल, असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केला. प्रवाशांच्या सुविधांसाठी नवी वाट खुली करणाऱ्या या सोहळ्यास अनेक मान्यवर तसेच महायुतीचे पदाधिकारी हजर होते.
आमदार पाटील यांच्या माहितीनुसार, एस टी डेपोतील वर्कशॉप आणि इतर कामांसाठी सुरुवातीला आठ कोटी रुपये मंजूर झाले होते, ही कामे आता जवळजवळ पूर्ण झाली आहेत. डेपोची अवस्था बिकट असल्याने राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा निधी आणण्यात आला. या निधीतून पार्किंग परिसराची दुरुस्ती, वर्कशॉपचे नूतनीकरण तसेच व्यवस्थापकाचे कार्यालय आणि निवासस्थान यांची सुधारणा करण्यात आली. त्यानंतर आगाराच्या परिसरातील कॉंक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक आणि रंगरंगोटीसाठी आणखी अडीच कोटी रुपये मिळवण्यात आले असून, त्याचे प्रत्यक्ष काम आजपासून सुरू झाले आहे.
अमळनेर मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती असल्याने आमदार पाटील यांनी सत्कार न स्वीकारता शेतकऱ्यांप्रति संवेदना व्यक्त केली. ग्रामीण जनतेसाठी एस टी किती महत्त्वाची आहे, हे आपण जाणतो, कारण आपली आई रोज याच एस टी ने गावातील शेतात जाते, असे त्यांनी भाषणात सांगितले.
अमळनेर आगाराला १०० बसेसची गरज असताना केवळ ९० बसेस उपलब्ध होत्या, आणि त्यातील बहुतेक जीर्ण अवस्थेत होत्या. शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे २० ते २२ नव्या बसेस मिळाल्या असून, आणखी किमान ५० बसेस मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बसस्थानकापासून अगदी जवळच नवीन प्रशासकीय इमारत व पंचायत समिती इमारतीचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बसने आल्यानंतर चालतच सर्व शासकीय कार्यालयांतील कामे उरकता येतील, जवळच्या बाजारातून खरेदी करून ते लवकर घरी परतू शकतील, याचे आपल्याला विशेष समाधान असेल, असेही ते म्हणाले.
बसस्थानकावर ग्रामीण भागातील अनेक शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आमदारांनी त्यांना आदराने बोलावून त्यांच्या हस्ते नारळ वाढवून भूमिपूजन केले आणि कामाचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमास माजी जि. प. सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील, ज्येष्ठ नेत्या सौ. तिलोत्तमा पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, सौ. रिता बाविस्कर, कामगार नेते एल टी पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, भाजपचे ॲड. व्ही. आर. पाटील, शीतल देशमुख, उमेश वाल्हे, शहराध्यक्ष योगेश महाजन, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश अर्जुन पाटील, माजी शहरप्रमुख संजय पाटील, आगार व्यवस्थापक राकेश शिवदे, वाहतूक निरीक्षक मुकेश सैदाणे, वरिष्ठ लिपिक तुषार लुंखे, अमोल पाटील आदी उपस्थित होते. त्यांच्यासह राष्ट्रवादी व महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक, शेतकी संघ व मार्केट समितीचे पदाधिकारी, पत्रकार, एस टी कर्मचारी, युनियन पदाधिकारी आणि प्रवासीही सहभागी झाले. कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले.
![]()

