विश्लेषणात्मक रसायनशास्त्रातील संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; IIT मुंबईचे माजी विद्यार्थी, BSNLचे निवृत्त अधीक्षक भास्कर बोरसे यांचे सुपुत्र…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर येथील बीएसएनएलचे निवृत्त अधीक्षक भास्कर बोरसे यांचे सुपुत्र आणि संशोधक डॉ. विवेक बोरसे यांचा स्टॅनफोर्ड विद्यापीठ व एल्सेव्हियर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘जगातील अव्वल २ टक्के शास्त्रज्ञ’ (Top 2% Scientists) या यादीत २०२५ आणि २०२६ या सलग दोन वर्षांसाठी समावेश झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विश्लेषणात्मक रसायनशास्त्रातील त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. बोरसे यांची संस्थात्मक संलग्नता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER), हैदराबाद अशी नमूद करण्यात आली आहे. त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT Bombay) येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. विश्लेषणात्मक रसायनशास्त्र आणि वैद्यकीय तंत्रज्ञान या क्षेत्रांतील त्यांचे संशोधन तसेच शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांतील अनुभव त्यांच्या व्यावसायिक वाटचालीतील महत्त्वाचे पैलू आहेत.
डॉ. विवेक बोरसे यांनी वैद्यकीय तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उपकरणनिर्मिती उद्योगातही काम केले आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विकास, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची रचना आणि प्रयोगशाळेतील संशोधनाचे औद्योगिक स्तरावर उपयोजन या क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले आहे. संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान प्रत्यक्ष आरोग्यसेवेत उपयोगी ठरावे, या दृष्टीने त्यांचे कार्य महत्त्वाचे मानले जाते.
स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि एल्सेव्हियर यांच्या सहकार्याने प्रसिद्ध होणाऱ्या जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत संशोधकांच्या वैज्ञानिक प्रकाशनांचा आणि संशोधनाच्या प्रभावाचा विचार केला जातो. या यादीत विविध संशोधन क्षेत्रांतील शास्त्रज्ञांचे मूल्यमापन वैज्ञानिक निकषांनुसार केले जाते. त्यामुळे या यादीतील समावेश हा संशोधकांच्या शैक्षणिक कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचे निदर्शक मानला जातो.
आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. बोरसे यांनी संशोधनातील प्रगती ही केवळ एका व्यक्तीची उपलब्धी नसून सामूहिक प्रयत्न, सहकार्य आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून घडणारी प्रक्रिया असल्याचे नमूद केले. या प्रवासात मार्गदर्शन करणारे गुरुजन, सहकारी संशोधक आणि इतर सहकाऱ्यांचे योगदान मोलाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
आगामी काळात वैज्ञानिक संशोधनाला अधिक गती देणे, नवनवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि सामान्य नागरिकांना प्रत्यक्ष लाभ होईल अशा आरोग्यविषयक तंत्रज्ञानावर भर देणे, हा आपला मानस असल्याचे डॉ. बोरसे यांनी व्यक्त केला. त्यांच्या या यशामुळे संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
डॉ. विवेक बोरसे यांच्या या कामगिरीबद्दल अमळनेरसह वैज्ञानिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
![]()

