मुंबईतील ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६’ सोहळ्यात सन्मान; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह शाळेच्या गुणवत्तापूर्ण कार्याची दखल…
प्रतिनिधी | अमळनेर : पिंपळे बु. येथील सु. अ. पाटील प्राथमिक / यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेला मुंबई येथे आयोजित ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६’ सोहळ्यात ‘बेस्ट स्कूल – स्टेट बोर्ड – जळगाव – अमळनेर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ESFE (Education Supply and Franchise Expo) आणि द टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात ८ ऑक्टोबर २०२६ रोजी नेस्को, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे शाळेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांमधील शिस्त, स्वच्छता, संस्कार आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची या यशात महत्त्वाची भूमिका आहे.
शाळेच्या प्रगतीत माध्यमिक मुख्याध्यापक श्री. उदय आत्माराम पाटील आणि प्राथमिक मुख्याध्यापक श्री. अविनाश अहिरे यांचे नेतृत्व, शिक्षकांचे परिश्रम, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विद्याताई युवराज पाटील, सचिव व शैक्षणिक मार्गदर्शक श्री. युवराज पाटील आणि संचालक ॲड. श्री. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.
शाळेने यापूर्वीही विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४–२०२५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला होता. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्या अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘सुंदर माझी शाळा’ उपक्रमातही शाळेला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. या यशांमुळे शाळेच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि परिसर विकासाच्या कार्याला मान्यता मिळाली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यावर शाळेत भर दिला जातो. वाचन, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, थोर महापुरुषांच्या विचारांचा परिचय आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यशासोबतच आत्मनिर्भर आणि जबाबदार नागरिक म्हणून घडावे, हा शाळेच्या शैक्षणिक दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भाग आहे.
‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६’ हा पुरस्कार शाळेच्या आजवरच्या कार्याची दखल घेणारा असून, भविष्यातही शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे. संस्थेचे मार्गदर्शन, मुख्याध्यापकांचे नियोजनबद्ध नेतृत्व आणि शिक्षकांचे सामूहिक प्रयत्न यांच्या बळावर यशवंत आश्रमशाळेने शैक्षणिक क्षेत्रात आपली ओळख अधिक दृढ केली आहे.
![]()

