पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्रस्तरीय अधिवेशन उत्साहात; मान्यवरांच्या हस्ते गौरव…
प्रतिनिधी | अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पाचोरा येथे आयोजित ‘उत्तर महाराष्ट्रस्तरीय अधिवेशन – २०२६’ मध्ये अमळनेर येथील ‘दिव्य खान्देश’ वृत्तपत्राचे संपादक श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल ‘युवा पत्रकार पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. दि. १० रोजी पार पडलेल्या या अधिवेशनात पत्रकारितेतील निष्ठा, कार्यशैली आणि समाजहितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे आणि खान्देश सरचिटणीस डॉ. विजय गाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते कांबळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अधिवेशनाला उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सुरेश कांबळे यांनी पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहून आपल्या कामातून पत्रकारितेप्रती निष्ठा जपली आहे. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, जनहिताच्या विषयांना प्रसिद्धी देणे आणि समाजाच्या विकासाशी संबंधित मुद्दे मांडणे या कार्यातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
कांबळे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल अमळनेरसह उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्रातून तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याचा गौरव झाला असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
![]()

