खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’; पहिल्याच दिवशी चार हजार विद्यार्थी व नागरिकांची भेट…
प्रतिनिधी | अमळनेर: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असताना शेतीसोबतच उद्योग आणि व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याची गरज आहे. तरुणांनी पारंपरिक रोजगाराच्या संधींपलीकडे जाऊन उद्योग, व्यवसाय आणि स्टार्टअपच्या क्षेत्रात नवनवीन संधी शोधाव्यात. त्यासाठी ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले. प्रदर्शनातील विविध संस्था, शासकीय योजना आणि उपक्रमांचा अभ्यास करून तरुणांनी उद्योगाच्या नव्या संकल्पना आत्मसात कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने कलागुरू मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उद्योग-व्यवसायाच्या संधी, रोजगाराच्या सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी चार हजार नागरिकांचा प्रतिसाद
प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी अमळनेर शहरासह पंचक्रोशीतील नागरिक, विद्यार्थी आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह सुमारे चार हजार नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध शासकीय योजना, उपक्रम आणि रोजगाराच्या संधींची माहिती घेतली. विजयनाना पाटील आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले संचलन हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.
खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, यापूर्वी जळगाव येथे अशा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि तरुणांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात, या उद्देशाने यंदा अमळनेर येथे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
७५ हून अधिक संस्थांचा सहभाग
‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ प्रदर्शनात केंद्र व राज्य शासनाच्या ७५ हून अधिक संस्था सहभागी झाल्या आहेत. कर्नाटक साबण व डिटर्जंट लिमिटेड, भारतीय पॅकेजिंग संस्था, जैवतंत्रज्ञान विभाग, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद, भारतीय मानक ब्युरो, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, राष्ट्रीय बीज निगम, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन निगम, यंत्र इंडिया लिमिटेड, भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण, डाक विभाग, महाजेनको, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, महावितरण, भारतीय रिझर्व्ह बँक, नाबार्ड, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांसह विविध संस्थांचे स्टॉल प्रदर्शनात उभारण्यात आले आहेत.
या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थी, शेतकरी, तरुण उद्योजक, महिला आणि नागरिकांना शासनाच्या विविध योजना, रोजगाराच्या संधी, उद्योगासाठी उपलब्ध सुविधा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती एकाच ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे शासकीय योजना आणि उद्योगविषयक संधींबाबत प्रत्यक्ष माहिती जाणून घेण्यासाठी प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.
शेतकरी कुटुंबाला दोन लाखांचा धनादेश
प्रदर्शनादरम्यान युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने मंगरूळ येथील दिवंगत शेतकरी बापू साहेबराव पाटील यांच्या वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दोन लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
उद्योजकांच्या अडचणींवर चर्चा
सायंकाळी अमळनेर शहरातील व्यापारी तसेच एमआयडीसीतील उद्योजकांची खासदार स्मिताताई वाघ यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी उद्योजकांनी उद्योगवाढीसमोरील विविध अडचणी मांडल्या. तालुक्यात उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक सुविधा आणि उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार वाघ यांनी दिले.
उद्घाटन कार्यक्रमास रावेरचे आमदार अमोल जावळे, विधान परिषद सदस्य नंदुभाऊ महाजन, खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरजभाऊ अग्रवाल, म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे चीफ जनरल मॅनेजर एम. झेड. सरवर, यंत्र इंडिया लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर निरंजन लाल, भाजप मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, राहुल पाटील, योगेश महाजन, भाजप कृषी आघाडीचे श्रीनिवास मोरे, फ्रेंड्स एक्झिबिशनचे चेअरमन आनंद पाल, अखिला श्रीनिवासन, दीपकसिंग मेहता, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ॲड. कृतिका अप्रे, भारती सोनवणे आणि डीसीसीच्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता थोरे यांनी केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील यांनी आभार मानले.
![]()

