पाडळसरेचे मूळ रहिवासी असलेल्या दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात?, तपासाकडे लक्ष…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील पाडळसरे येथील मूळ रहिवासी व सध्या उत्राण, ता. एरंडोल येथे वास्तव्यास असलेल्या तरुण दाम्पत्याचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ८) उघडकीस आली. श्याम हरी पाटील (वय २८) आणि त्यांची पत्नी सपना (वय २०) यांचे मृतदेह नरडाणा, ता. शिंदखेडा येथील तापी नदीपात्रात पायांना लोखंडी साखळीने एकमेकांना बांधलेल्या व कुलूप लावलेल्या अवस्थेत आढळून आल्याने घटनेबाबत संशय निर्माण झाला आहे.
नरडाणा शिवारातील तापी नदीत दुपारी सुमारे १२ ते १ वाजेच्या दरम्यान दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच नरडाणा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कापडणीस यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह नदीबाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी श्याम यांच्या डाव्या पायाला आणि सपना यांच्या उजव्या पायाला लोखंडी साखळीने एकत्र बांधून त्यास मोठे कुलूप लावल्याचे आढळून आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
श्याम पाटील हे काही वर्षांपूर्वी पाडळसरे येथून रोजगाराच्या निमित्ताने उत्राण येथे गेले होते. तेथे ते शेतीकाम तसेच ट्रॅक्टर चालविण्याचे काम करीत होते. याच काळात आपल्या बहिणीकडे राहणाऱ्या सपना यांच्याशी त्यांची ओळख झाली. पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊन दोघांनी प्रेमविवाह केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही तीन-चार दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांचे मृतदेह तापी नदीत आढळून आल्याने नातेवाइकांमध्ये खळबळ उडाली. विशेषतः दोघांचे पाय साखळीने बांधून त्यावर कुलूप लावलेले आढळल्याने या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही आत्महत्या होती की अन्य कोणती घटना, याबाबत सध्या निश्चित निष्कर्ष काढता येत नसून शवविच्छेदनाचा अहवाल आणि पोलिस तपासातून घटनेचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाइकांनी घटनास्थळी व शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. पोलिसांनी पंचनामा व इतर प्राथमिक कार्यवाही पूर्ण केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
![]()

