अमळनेर शहर-तालुक्यातील मंडळांना महावितरणचा नवा नियम; तात्पुरत्या वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्ज, ४८ तासांत जोडणीची सुविधा…
प्रतिनिधी | अमळनेर : नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला असताना अमळनेर शहर व तालुक्यातील नवरात्रोत्सव मंडळांसाठी यंदा तात्पुरत्या वीजजोडणीच्या प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव तसेच धार्मिक उत्सवांसाठी घेण्यात येणाऱ्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे मंडळांना मोबाइल रिचार्जप्रमाणे आधी वीजबिलाची रक्कम भरावी लागणार असून, उपलब्ध रकमेच्या मर्यादेतच वीज वापरता येणार आहे. परिणामी मंडपातील विद्युत रोषणाई, ध्वनिव्यवस्था आणि अन्य विद्युत उपकरणांच्या वापराचे नियोजन मंडळांना करावे लागणार आहे.
तात्पुरत्या वीजजोडणीसाठी संबंधित मंडळांनी महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांच्या आत तात्पुरती वीजजोडणी देण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याने मंडळांनी ऐन उत्सवाच्या काळात अडचणी टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज वेळेत करणे अपेक्षित आहे.
गतवर्षी अमळनेर शहर व तालुक्यात ८० हून अधिक नवरात्रोत्सव व दुर्गापूजा मंडपांना तात्पुरता वीजपुरवठा करण्यात आला होता. यंदाही मोठ्या संख्येने मंडळांकडून वीजजोडणीसाठी अर्ज होण्याची शक्यता आहे. उत्सव काळात वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारी किंवा तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देण्यासाठी महावितरणकडून क्विक रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सव मंडळांना वीजपुरवठा घरगुती दराने करण्यात येणार असून, तात्पुरत्या वीजजोडणीसाठी आकारण्यात येणारे दरही तुलनेने स्वस्त राहणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकृत जोडणी घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने वीज वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, उत्सवाच्या काळात मंडपांमध्ये अनधिकृत वीजजोडणी, सदोष वायरिंग किंवा मंजूर क्षमतेपेक्षा अधिक विद्युत भाराचा वापर केल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी मंडळांनी अनधिकृत जोडण्या टाळून अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घेऊनच विद्युत रोषणाई करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजचोरी, सदोष वायरिंग आणि क्षमतेपेक्षा जास्त भाराचा वापर टाळण्याबरोबरच सुरक्षित विद्युत वापराचे नियम पाळण्याचेही मंडळांना आवाहन करण्यात आले आहे. “आधी रिचार्ज, मगच रोषणाई” या नव्या पद्धतीनुसार यंदाच्या नवरात्रोत्सवात मंडळांना वीज वापराचे आर्थिक नियोजन करावे लागणार आहे, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर अंबाडकर यांनी दिली.
![]()

