लाईट, पाणी, रनिंग ट्रॅक, ओपन जिमसह मूलभूत सुविधा देण्याची मागणी; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा…
प्रतिनिधि | अमळनेर : तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंसह पोलीस, आर्मी व वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या शेकडो तरुण-तरुणींना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या सरावासाठी प्रकाशव्यवस्था, पिण्याचे पाणी, रनिंग ट्रॅक, ओपन जिमची दुरुस्ती, पार्किंग तसेच बाथरूम व कपडे बदलण्याची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते ललित यशवंत सातपुते यांनी प्रशासनाला दिला आहे.

यासंदर्भात सातपुते यांनी तालुका क्रीडा अधिकारी, अमळनेर यांना निवेदन देऊन क्रीडा संकुलातील सुविधांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी तसेच केंद्रीय व राज्य क्रीडामंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
अमळनेर शहर व ग्रामीण भागातील शेकडो युवक-युवती दररोज या मैदानावर विविध क्रीडा प्रकारांसह पोलीस, सैन्य व वनरक्षक भरतीपूर्व शारीरिक सरावासाठी येतात. मात्र मैदानावर रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने सायंकाळनंतर सराव करणे अडचणीचे ठरत आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी आणि योग्य रनिंग ट्रॅक नसल्याने भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
क्रीडा संकुलातील ओपन जिममधील खराब व तुटलेले साहित्य दुरुस्त करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय दुचाकी व सायकलींसाठी पार्किंग, फुटबॉलसाठी आवश्यक पोल, मैदानाला कंपाऊंड भिंत तसेच खेळाडूंसाठी कपडे बदलण्याची जागा आणि बाथरूमची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
क्रीडा संकुल हे शहरासह ग्रामीण भागातील खेळाडू आणि शासकीय सेवांच्या भरतीसाठी शारीरिक तयारी करणाऱ्या युवकांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे केवळ तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी आवश्यक सुविधांची कायमस्वरूपी पूर्तता करून मैदानाचा योग्य विकास करावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन समस्यांचे निराकरण न झाल्यास क्रीडाप्रेमी, भरतीप्रेमी तरुण आणि वयोवृद्ध नागरिकांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
![]()

