तीन म्हशी, गाय व वासरू चोरीला; सुमारे १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल, अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील दहिवद शिवारात शेतकऱ्यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेली तीन म्हशी, एक गाय आणि एक वासरू अशी पाच जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. ३ रोजी रात्री ते दि. ४ रोजी सकाळदरम्यान घडली. चोरी झालेल्या जनावरांची एकूण किंमत सुमारे १ लाख ३५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले असून, या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
दहिवद शिवारातील शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपापली जनावरे खळ्यात व गोठ्यात बांधून ठेवली होती. मात्र, सकाळी जनावरे जागेवर नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात चोरट्यांनी जनावरांचे दोर कापून त्यांना तेथून नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या चोरीमध्ये भूषण नारायण माळी यांची एक म्हैस, जितेंद्र बाबूलाल माळी यांची एक म्हैस आणि साहेबराव सुरेश माळी यांची एक म्हैस, तसेच अन्य एक गाय व एक वासरू अशी एकूण पाच जनावरे चोरीला गेली आहेत. जनावरे चोरीला गेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.
![]()

