परवाना नसताना मुरूम वाहतूक केल्याचा आरोप; १० लाख ९ हजार ५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त…
प्रतिनिधी | अमळनेर : अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणारा डंपर महसूल विभागाच्या पथकाने पकडल्याच्या घटनेनंतर तब्बल १२ दिवसांनी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी फरशी पुलाकडून गांधलीपुराकडे मुरूम वाहतूक करणारा डंपर आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात डंपरसह एकूण १० लाख ९ हजार ५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या आदेशानुसार मंडळाधिकारी नरेंद्रकुमार धनराळे, ग्राममहसूल अधिकारी अशपाक पिंजारी आणि अदिती जरे हे दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गस्तीवर होते. यावेळी एमएच १४ सीपी ७२७५ क्रमांकाचा डंपर फरशी पुलाकडून गांधलीपुराच्या दिशेने जाताना पथकाला आढळून आला.
पथकाने डंपर अडवून तपासणी केली असता चालकाकडे मुरूम वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आल्याचे महसूल विभागाच्या कारवाईत नमूद करण्यात आले आहे. चालकाने आपले नाव अजय विजय वानखेडे, रा. आर्डी, असे सांगितले.
या कारवाईत सुमारे १० लाख रुपये किमतीचा डंपर आणि ९ हजार ५६ रुपये किमतीचा मुरूम असा एकूण १० लाख ९ हजार ५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महसूल पथकाच्या कारवाईनंतर या प्रकरणातील कायदेशीर कारवाईसाठी दि. ४ ऑक्टोबर रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
याप्रकरणी चालक अजय विजय वानखेडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३०५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर १२ दिवसांनी गुन्हा दाखल झाल्याने कारवाईच्या कालावधीची बाबही या प्रकरणात लक्षवेधी ठरली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.
![]()

