अजय भामरे यांच्या तक्रारीने अमळनेरच्या पत्रकारिता क्षेत्रात खळबळ; जातिवाचक शिवीगाळ व धमकीचे गंभीर आरोप…
प्रतिनिधी | अमळनेर : पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘लेखन मंच’चे कार्यकारी संपादक तथा पत्रकार अजय भामरे यांच्या तक्रारीने अमळनेरच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. भामरे यांच्या तक्रारीवरून ‘सचोटी’ न्यूज चॅनलचा संपादक राजकुमार छाजेड याच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भामरे यांच्या तक्रारीनुसार, पत्रकारितेच्या कामावरून त्यांना लक्ष्य करण्यात आले असून, जातिवाचक शिवीगाळ, धमकी आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. तसेच आपल्याविरुद्ध यापूर्वी खोटी तक्रार करून अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
या प्रकारामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात मतभेद असू शकतात; मात्र जातिवाचक अपमान आणि धमकीचे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पत्रकारितेचा वापर परस्परांवरील वैयक्तिक किंवा जातीय संघर्षासाठी होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
विविध कलमांखाली गुन्हा दाखल
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 351(2) व 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 1989 मधील कलम 3(1)(p), 3(1)(q), 3(1)(r), 3(1)(s) आणि 3(2)(va) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अजय भामरे यांनी यापूर्वी या प्रकरणासंदर्भात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार केल्याचे नमूद केले आहे. अखेर पोलीस तपासानंतर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला आता कायदेशीर वळण मिळाले आहे.
पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. संबंधितांचे जबाब, उपलब्ध पुरावे, कागदपत्रे आणि घटनाक्रम यांचा तपास करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
‘जातीय विषाला थारा नको’
या घटनेनंतर बुद्धिजीवी वर्गात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पत्रकारांमधील मतभेद असले तरी ते वैचारिक आणि कायदेशीर मार्गाने सोडविले जावेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातील माणूसाची जातीय मानसिकता नको, जातीय तेढ, धमकी किंवा वैयक्तिक संघर्षाला स्थान मिळू नये, अशी भूमिका सामाजिक स्तरावरून व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात कोण दोषी आहे, याचा अंतिम निर्णय तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे. मात्र जातिवाचक शिवीगाळ व धमकीचे आरोप आणि त्यानंतर दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा याबाबत तालुक्यात मोठ्या चर्चाना उधाण आले आहे.
दरम्यान छाजेडवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फसवणूक व इतर प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची चर्चा असुन त्याची चौकशी करून त्यास महाराष्ट्रातून हद्दपार करावे अशी मागणी राज्य शासनाकडे काही संघटना करण्यार असल्याचे समजते.
![]()

