प्रताप महाविद्यालयात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त कथाकथन; विद्यार्थ्यांना साहित्याच्या सामाजिक सामर्थ्याची अनुभूती…
प्रतिनिधी | अमळनेर : राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची असून साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून मानवी मन घडविणारे, संवेदनशीलता जागविणारे आणि जीवनाला दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कथाकार सुभाष अहिरे यांनी केले. खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त आयोजित ‘मराठी कथाकथन’ कार्यक्रमात ते बोलत होते. अहिरे यांच्या ओघवत्या आणि रसाळ कथाकथनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कथा ही मानवी जीवन, अनुभव आणि सामाजिक वास्तवाशी घट्ट जोडलेली असते. त्यामुळे कथांच्या माध्यमातून जीवनमूल्ये, सामाजिक भान आणि मानवी संवेदना प्रभावीपणे व्यक्त करता येतात, असे सुभाष अहिरे यांनी सांगितले. त्यांच्या प्रभावी कथाकथनातून विद्यार्थ्यांना साहित्याच्या सर्जनशीलतेबरोबरच त्यातील सामाजिक आशय आणि परिवर्तनाची क्षमता अनुभवता आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी झालेल्या प्रदीर्घ प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेतला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा केवळ भाषेचा सन्मान नसून मराठी संस्कृती, साहित्य, परंपरा आणि समृद्ध भाषिक वारशाचा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित केला. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय जोपासावी, साहित्याचा आस्वाद घ्यावा आणि मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेशी आपले नाते अधिक दृढ करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल बडगुजर यांनी केले. डॉ. विलास गावित यांनी प्रमुख पाहुणे सुभाष अहिरे यांचा परिचय करून दिला. प्रा. सागर सैंदाणे यांनी आभार मानले. यावेळी मराठी विभागातील डॉ. रमेश माने, प्रा. योगेश पाटील, तुषार पाटील यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
![]()

