आदिवासी विकास विभागातील सेवाकार्याची दखल; दहिवद शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला दिले सातत्याने प्राधान्य…
विशेष बातमी | जळगाव : आदिवासी विकास विभागाच्या यावल प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय आश्रमशाळेत कार्यरत असलेल्या अधिक्षिका आयुष्यमती चारुशीला महाजन यांना त्यांच्या उत्कृष्ट, प्रामाणिक आणि समर्पित सेवेसाठी ‘आदर्श अधिकारी-कर्मचारी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष समारंभात त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, आदिवासी विकास विभाग यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, मिलिंद पाईकराव व मुसळे सर उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त (आदिवासी विकास, नाशिक) राजेंद्र हिवाळे यांनीही मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शविली.
आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळेच्या अधिक्षिका पदाची जबाबदारी ही विद्यार्थिनींचे शैक्षणिक, दैनंदिन आणि सुरक्षिततेशी निगडित अनेकविध प्रश्न हाताळण्याची असल्याने त्यासाठी सातत्यपूर्ण दक्षता आवश्यक असते. या जबाबदारीचे भान ठेवत चारुशीला महाजन यांनी सेवेला केवळ नोकरी न मानता कर्तव्य म्हणून स्वीकारल्याचे त्यांच्या सेवाप्रवासातून दिसून येते. २४ तास सेवा-सज्ज राहण्याची आवश्यकता असलेल्या या पदावर कार्यरत असताना त्यांनी आश्रमशाळेलाच आपले घर मानून विद्यार्थिनींच्या सुरक्षितता व हिताला प्राधान्य दिले.
चारुशीला महाजन यांनी आपल्या सेवाकार्याची सुरुवात पिंगळवाडे आश्रमशाळेतून केली. सध्या त्या दहिवद येथील शासकीय आश्रमशाळेत अधिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आश्रमशाळेतील मुलींची सुरक्षितता, त्यांच्या दैनंदिन गरजा आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन याकडे त्या सातत्याने लक्ष देत असल्याचे नमूद करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्याला प्राधान्य देत त्यांनी सेवा बजावली असून, त्यांच्या कार्याची शासनस्तरावर दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
‘नोकरी मिळणे सोपे; मात्र ती प्रामाणिकपणे टिकवणे कठीण’ हा विचार सेवाव्रताचा आधार मानून त्यांनी काम केले. त्यांच्या या प्रवासात संदानशिव परिवारातील आई व दादा तसेच समाजकार्याची आवड असलेले त्यांचे पती दीपक संदानशिव यांचे खंबीर पाठबळ लाभल्याचे परिवाराकडून सांगण्यात आले. कुटुंबाने दिलेले स्वातंत्र्य, विश्वास आणि सहकार्य यामुळे त्यांच्या सेवाकार्यास बळ मिळाल्याचेही नमूद करण्यात आले.
दरम्यान, दहिवद शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नितीन शिरसाट, शिक्षकवृंद तसेच इतर कर्मचारी यांनी चारुशीला महाजन यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन केले. परिवारातील सदस्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मिळालेला हा सन्मान त्यांच्या पुढील सेवाकार्यास प्रेरणादायी ठरणार असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. परिवर्तनवादी महामानव आणि महामातांच्या विचारांतून समाजसेवेचा वसा पुढे नेत विद्यार्थिनींच्या हितासाठी त्यांचे कार्य असेच सुरू राहावे, अशा शुभेच्छाही उपस्थितांनी दिल्या.
![]()

