प्रलंबित देयके दोन महिन्यांत अदा करण्याची मागणी; प्रश्न मार्गी न लागल्यास उपोषणाचा इशारा, ३,३८६ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या काल्पनिक वेतनवाढीच्या निकालाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा…
प्रतिनिधी | अमळनेर : जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघाच्या अमळनेर तालुका शाखेची ४४ वी वार्षिक सभा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मेघ नगरी, अमळनेर येथे उत्साहात पार पडली. निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा पाच तारखेच्या आत पेन्शन मिळावी, तसेच विविध प्रलंबित देयके व बिले दोन महिन्यांच्या आत अदा करण्यात यावीत, या प्रमुख मागण्यांसह निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रलंबित देयकांचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास तालुका कार्यकारिणीच्या वतीने उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तथा नाशिक विभागीय उपाध्यक्ष सदाशिव नारायण सोनवणे होते. निरीक्षक म्हणून धनराज हरी पाटील उपस्थित होते. अहवाल सादरीकरणादरम्यान त्यांनी अमळनेर तालुका कार्यकारिणीच्या कामकाजाचे कौतुक करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी सदस्य तसेच मोठ्या संख्येने निवृत्त कर्मचारी सभेस उपस्थित होते.
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक प्रश्नांवर चर्चा करताना पेन्शन वेळेत मिळणे आणि थकीत देयकांचा तातडीने निपटारा होणे आवश्यक असल्याचे सभेत मांडण्यात आले. विविध प्रकारची थकीत बिले व देयके दोन महिन्यांच्या आत अदा करण्याची मागणी करण्यात आली. या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास संघटनेच्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा देण्यात आला.
दरम्यान, काल्पनिक वेतनवाढीच्या संदर्भात जिल्ह्यातून दाखल करण्यात आलेल्या तीन याचिकांमध्ये ३,३८६ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निकाल लागल्याची माहिती सभेत देण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने वरिष्ठ पातळीवरून प्रशासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. साधारण दीड महिन्याच्या कालावधीत हे प्रकरण निकाली निघण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या प्रश्नाच्या अंमलबजावणीसाठी संघटनेचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी निर्धारित नमुन्यातील माहितीपत्रक आणि स्वाक्षरीसह अर्जाच्या दोन प्रती तयार ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले. त्यापैकी एक प्रत तालुका शाखेकडे, तर दुसरी प्रत जिल्हा शाखेकडे सादर करून त्याची पोहोच घ्यावी, अशी सूचना सभेत करण्यात आली.
सभेदरम्यान निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन आणि विचारविनिमय झाला. उपस्थितांसाठी श्रीमती भागाबाई चंद्रसिंग पवार यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन श्रीमती वसुंधरा यांनी केले.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर तालुकाध्यक्ष एच. मु. पाटील, कार्याध्यक्ष प्र. ल. सांगोळे, चिटणीस भा. सी. खंडेराय, श्रीमती शांताबाई मोरे, वसंतराव पाटील, चिंधू वानखेडे, मनोहर बाविस्कर, देविदास पाटील, सुरेश पाटील, प्रमिला पाटील, मोहन ताळे आदींनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मानल्यानंतर राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला.
![]()

