तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; मशाल प्रज्वलन, लोगो अनावरणानंतर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेने प्रारंभ…
प्रतिनिधी | अमळनेर : क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव तसेच अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा तालुका क्रीडासंकुलाच्या मैदानावर उत्साहपूर्ण आणि चुरशीच्या वातावरणात संपन्न झाल्या. अमळनेर तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अनिलदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष सी.ए. नीरजजी अग्रवाल, समन्वय समितीचे चेअरमन योगेश मुंदडे, प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए.के. अग्रवाल, डी.आर. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस.एस. सूर्यवंशी, श्री. नरेंद्र घोडपडे, तालुका क्रीडा अध्यक्ष तथा पर्यवेक्षक श्री. एस.पी. वाघ, क्रीडा समितीचे श्री. महेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर स्पर्धेची मशाल प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांना औपचारिक सुरुवात करण्यात आली. विविधरंगी फुगे आकाशात सोडून स्पर्धेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात स्पर्धेचे स्वागत केले. उद्घाटनानंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेने मैदानी स्पर्धांना सुरुवात झाली.
उद्घाटनप्रसंगी आमदार अनिलदादा पाटील यांनी खेळाचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्व अधोरेखित केले. क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना व एकात्मतेची जाणीव दृढ होते, मानसिक सामर्थ्य वाढते आणि शारीरिक चपळता निर्माण होऊन शरीर निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी नियमित मेहनत घेण्याबरोबरच स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आणि मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच म्हणून श्री. के.आर. बाविस्कर, श्री. कमलेश मोरे, श्री. गोकुळ बोरसे, श्री. जे.व्ही. बाविस्कर, श्री. बापुराव सांगोरे, श्री. प्रीतेश तुरणकर, श्री. नितीन पाटील, श्री. सुनील करंदीकर, श्री. मनोज पाटील, श्री. हिरालाल बाविस्कर, श्री. विनायक सूर्यवंशी, श्री. दर्शन पाटील, श्री. मयूर बारस्कर, श्री. सागर चावरिया, श्री. योगेश पाटील आणि श्री. राज जाधव यांनी जबाबदारी सांभाळली. पंचांच्या नियोजनबद्ध कामकाजामुळे विविध मैदानी स्पर्धा सुरळीतपणे पार पडल्या. विद्यार्थ्यांचा उत्साह, स्पर्धात्मकता आणि क्रीडाभावनेने तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांना विशेष रंगत प्राप्त झाली.
![]()

