केंद्र व राज्य सरकारच्या ७० हून अधिक योजनांची माहिती एकाच छताखाली; खासदार स्मिता वाघ यांच्या पुढाकारातून ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान आयोजन…
प्रतिनिधी | अमळनेर : केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे, आधुनिक तंत्रज्ञान आणि शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी अमळनेरात बुधवारपासून ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ या तीन दिवसीय भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार स्मिता उदय वाघ यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली दिल्ली येथील ‘फ्रेंड्स एक्झिबिशन अँड प्रमोशन’ संस्थेच्या वतीने ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान कलागुरु मंगल कार्यालय येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या ७० हून अधिक योजनांची माहिती या प्रदर्शनातून नागरिकांना मिळणार असल्याने शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक, उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते तसेच जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे. प्रदर्शन दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार असल्याची माहिती ‘फ्रेंड्स एक्झिबिशन अँड प्रमोशन’ संस्थेचे चेअरमन आनंद पाल यांनी दिली. देश आणि राज्याच्या विकासाच्या विविध क्षेत्रांतील वाटचालीची माहिती नागरिकांना प्रत्यक्ष प्रदर्शनाच्या माध्यमातून समजून घेता यावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
गतवर्षी जळगाव येथील जी.एस. मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या प्रदर्शनाचा लाभ अमळनेर आणि परिसरातील नागरिकांनाही मिळावा, या उद्देशाने यंदा अमळनेर येथे आयोजन करण्यात आले आहे. एकाच जिल्ह्यात हे प्रदर्शन दुसऱ्यांदा आयोजित करण्यात येत असल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले.
‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’मध्ये कृषी व फलोत्पादन, विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग व विमा, आरोग्य, वाणिज्य व व्यापार, ऊर्जा व पर्यावरण, शिक्षण, ग्राहक जागरूकता, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान, वाहतूक, रेल्वे, पर्यटन, हस्तकला व हातमाग, रसायने व खते आदी विविध क्षेत्रांशी संबंधित योजनांची आणि उपक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विविध सामाजिक व आर्थिक घटकांना आपल्या गरजेनुसार शासनाच्या योजना आणि उपक्रमांची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे नागरिकांना योजनांची माहिती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, आयएएस अधिकारी, संचालक तसेच वैज्ञानिक प्रत्यक्ष प्रदर्शनस्थळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे केवळ योजनांची माहिती पाहण्यापुरते मर्यादित न राहता संबंधित विभागांकडून योजनांची कार्यपद्धती, उपलब्ध सुविधा आणि त्यांचा लाभ घेण्यासंदर्भातील माहिती जाणून घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी माहितीची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन नागरिक आणि शासनाच्या विविध योजना यांच्यातील माहितीची दरी कमी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक, उद्योजकांसह जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी केले.
या संदर्भातील पत्रकार परिषदेला अखिला श्रीनिवासन, दीपकसिंह मेहता, साक्षी सैनी, दत्ता थोरे, संतोष पवार, नीरज अग्रवाल, डॉ. अनिल शिंदे आदी उपस्थित होते.
![]()

