सफाई कामगारांच्या घरकुलांसह डीपी रस्ता मोकळा करण्याच्या मागण्यांवर अजूनही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप…
प्रतिनिधी | अमळनेर : मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित केलेले आमरण उपोषण पुन्हा सुरू करण्याचा इशारा सोमचंद संदानशिव यांनी दिला आहे. आपल्या मागण्यांवर आश्वासनानुसार एका महिन्यात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत, सोमचंद संदानशिव हे दि. ५ ऑक्टोबर २०२६ पासून पुन्हा आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.
हॉटेल मिडटाऊन, मल्टिप्लेक्स एन्टरटेन्मेंट कर तसेच पात्र पावतीधारक सफाई कामगारांना टाकरखेडा रस्त्यावरील म्हाडाच्या घरकुलांमध्ये घरे उपलब्ध करून देणे, तसेच ठगुआई रिसॉर्टचे अनधिकृत बांधकाम हटवून डीपी रस्ता मोकळा करणे, या प्रमुख मागण्यांसाठी सोमचंद संदानशिव यांनी दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनापासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित मागण्यांवर एका महिन्यात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले होते.
मात्र, लेखी आश्वासनाची मुदत उलटूनही मागण्यांच्या अनुषंगाने अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे सोमचंद संदानशिव यांनी म्हटले आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी ज्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते, त्याच मागण्यांच्या पूर्ततेसाठी ते पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत.
दरम्यान, यापूर्वीच्या उपोषणाच्या वेळीही सोमचंद संदानशिव यांनी सफाई कामगारांच्या घरकुलाचा प्रश्न, तसेच डीपी रस्त्यावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाचा मुद्दा प्रशासनासमोर उपस्थित केला होता. आता लेखी आश्वासनानंतरही कार्यवाही न झाल्याने त्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या आमरण उपोषणादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही सोमचंद संदानशिव यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून आता कोणती भूमिका घेतली जाते आणि संबंधित प्रश्नांवर प्रत्यक्ष कार्यवाही होते का, याकडे लक्ष लागले आहे.
![]()

