पारोळ्यातील स्पर्धा परीक्षार्थींना, चार अभ्यासक्रमांचे प्रत्येकी २० संच स्वखर्चातून केले वितरित…
विशेष बातमी | पारोळा : स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रतिकूल परिस्थितीत सराव आणि सामूहिक अभ्यास करणाऱ्या पारोळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या पुढाकारातून अभ्यास साहित्याची मदत मिळाली. शनिवारी घुगे यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिलेल्या चार अभ्यासक्रमांच्या प्रत्येकी २० पुस्तक संचांचे विद्यार्थ्यांना वितरण केले. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी पुस्तकांची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन दिले होते.
पारोळा शहर व तालुक्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मैदाने व सरावाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कासोदा रस्त्यालगतच्या ओसाड जागेचा वापर सुरू केला. श्रमदानातून झुडपे व दगड-गोटे दूर करून जागा स्वच्छ करण्यात आली आणि धावण्याचा सराव करण्यासाठी धावपट्टी तयार झाली. व्यायामाच्या सुविधा उभ्या करण्यात आल्या आणि त्याच ठिकाणी सामूहिक अभ्यासालाही सुरुवात झाली. मैदानाची कमतरता आणि साधनांचा अभाव असतानाही स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या विद्यार्थ्यांची जिद्द कायम राहिली.
सामूहिक अभ्यास सुरू असला तरी काही विषयांसाठी आवश्यक साहित्याची कमतरता जाणवत होती. स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके व अभ्यासक्रमांचे साहित्य महागडे असल्याने अनेक विद्यार्थ्यांना ते घेणे शक्य नव्हते. विद्यार्थ्यांची ही धडपड जिल्हाधिकारी घुगे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी कासोदा रस्त्यावरील मैदानाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे कौतुक करत त्यांनी क्रीडा संकुलातील धावपट्टीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच, “पुस्तकांची चिंता करू नका,” असे सांगत चार वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे प्रत्येकी २० संच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या आश्वासनाची पूर्तता करत घुगे यांनी शनिवारी विद्यार्थ्यांना आपल्या कार्यालयात बोलावून स्वखर्चातून खरेदी केलेले पुस्तकांचे संच त्यांच्या हाती सोपवले. पुस्तकांचे संच मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अभ्यासाच्या साहित्याची अडचण दूर झाल्याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला नवी साथ मिळाली आहे.
पुस्तके उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक अभ्याससाहित्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. पुस्तक वितरणानंतर विद्यार्थ्यांना क्रीडा संकुलाची पाहणीही करून देण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी संकुलातील विविध सुविधा आणि त्यांचा वापर याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
![]()

