नागरिकांच्या सहकार्याने अग्निशमन दलाची तत्पर कारवाई; राजे संभाजीनगरात १५ फूट खोल पाण्याने भरलेल्या शोषखड्ड्यात पडली होती गाय…
प्रतिनिधी | अमळनेर : राजे संभाजीनगर परिसरात आज रविवारी (दि. ४) सकाळी साडेअकराच्या सुमारास सुमारे १५ फूट खोल व पाण्याने भरलेल्या शोषखड्ड्यात गर्भवती गाय पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती समाजसेवक जालू चौधरी यांनी तत्काळ अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना दिली. माहिती मिळताच मुख्याधिकाऱ्यांनी अग्निशमन प्रमुख गणेश गोसावी यांना घटनास्थळी तातडीने अग्निशमन पथक पाठविण्याचे निर्देश दिले.
मुख्याधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुमारे १५ फूट पाण्याने भरलेल्या शोषखड्ड्यात अडकलेल्या गायीची स्थिती पाहून अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले. प्रतिकूल परिस्थितीत शर्थीचे प्रयत्न करीत तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गायीला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.
या बचावकार्यात अग्निशमन दलाचे फायरमन दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख, आनंदा झिबल, मच्छिन्द्र चौधरी आणि लखन कंखरे यांनी सहभाग घेतला. अथक प्रयत्नांनंतर गर्भवती गायीची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले.
घटनेची माहिती मिळताच तत्परतेने कारवाई करून गायीचे प्राण वाचविल्याबद्दल राजे संभाजीनगर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या पथकाचे कौतुक केले.
![]()

