शाहूनगर, नवीन स्वामी समर्थ केंद्र व अथर्व बंगलोज परिसरातील घटना; पोलिसांकडून तपासासाठी पथक रवाना…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील शाहूनगर, नवीन स्वामी समर्थ केंद्र आणि अथर्व बंगलोज परिसरात रविवारी (दि. ४) पहाटे अज्ञात चोरट्यांनी सहा ठिकाणी घरफोडी व चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनांमध्ये काही घरांसह एका किराणा दुकानाला लक्ष्य करण्यात आले असून, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहेत. चोरट्यांनी अंगावर चड्डी-बनियन परिधान करून तसेच चेहऱ्यावर मास्क लावल्याचे फुटेजमध्ये दिसत असल्याने पोलिसांकडून त्यांच्या टोळीचा शोध घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी शाहूनगर परिसरातील लक्ष्मण भदाणे, डिगंबर गालफाडे आणि हेमेंद्र प्रकाश पाटील यांच्या घरांना लक्ष्य केले. त्यानंतर नवीन स्वामी समर्थ केंद्र परिसरातील गणेश अनिल निंबाळकर यांच्या किराणा दुकानाचीही चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अथर्व बंगलोज परिसरात ज्ञानेश्वर हिम्मतराव ठाकूर आणि किरण महाजन यांच्या घरांमध्येही चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच नगरसेविका नीलिमा रवींद्र पाटील यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकळी ज आणि डीबी पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळांचा पंचनामा करून चोरीच्या घटनांशी संबंधित पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, चोरट्यांनी वापरलेली पद्धत, घटनास्थळावरील परिस्थिती आणि सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. एकाच रात्री शहरातील विविध भागांत सहा ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंता निर्माण झाली असून, पोलिसांकडून रात्रीच्या गस्तीला अधिक बळ देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
![]()

