बिबट्याने म्हशीचे पारडू उचलून नेल्याच्या घटनेनंतर वनविभागाची कार्यवाही; मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई उपस्थित…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील रांजणे शिवारात बिबट्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून पिंजरे लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. काल शेतकरी अशोक भाऊराव पाटील यांच्या खळ्यातून बिबट्याने म्हशीचे पारडू उचलून नेल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये बिबट्याच्या वावराबाबत चिंता निर्माण झाली आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने संबंधित परिसराची पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. संभाव्य वावराच्या ठिकाणी पिंजरे लावण्याची कार्यवाही करण्यात येत असून, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. या कार्यवाहीदरम्यान मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई यांची उपस्थिती होती.
रांजणे शिवारात बिबट्याचा वावर असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा शेतालगतच्या परिसरात एकट्याने जाणे टाळावे, तसेच पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग अथवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पिंजरे लावल्यानंतर वनविभागाकडून परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवले जाणार असून, बिबट्याचा ठावठिकाणा निश्चित करण्यासाठी आवश्यक निरीक्षण केले जाणार आहे. त्यामुळे रांजणे शिवारातील शेतकरी व नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
![]()

