व्हॉल्व चेंबरच्या अस्वच्छतेमुळे पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; नागरिकांकडून नगरपरिषदेकडे पाहणी व स्वच्छतेची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : तथागत गौतम बुद्ध विहार, फरशी रोड परिसरातील जलवाहिनीवरील व्हॉल्वच्या चेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर खराब व दूषित पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांना नळाद्वारे दुर्गंधीयुक्त पाणी मिळत असल्याची तक्रार आली आहे. नळाला पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर व्हॉल्वच्या ठिकाणी साचलेले दूषित पाणी जलवाहिनीत मिसळत असल्याने शुद्ध पाण्याची गुणवत्ता बाधित होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हे पाणी पिण्यासह घरगुती वापरासाठी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

फरशी रोडलगत तथागत गौतम बुद्ध विहाराच्या बाजूस असलेल्या जलवाहिनीच्या व्हॉल्व चेंबरमध्ये बराच काळ खराब पाणी साचून राहिल्याचे निदर्शनास येत आहे. चेंबरमध्ये साचलेल्या या पाण्याला दुर्गंधी येत असून, पाणीपुरवठा सुरू करताना व्हॉल्वच्या माध्यमातून त्याचा काही भाग जलवाहिनीत मिसळण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. परिणामी नळातून येणाऱ्या पाण्याला दुर्गंध येत असून, पाणी वापरताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नळाद्वारे मिळणारे पाणी नागरिकांकडून पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी तसेच दैनंदिन घरगुती कामांसाठी वापरले जाते. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणे आरोग्याच्या दृष्टीने गंभीर ठरू शकते.
दूषित किंवा सूक्ष्मजीवांनी बाधित पाण्याचा पिण्यासाठी अथवा स्वयंपाकासाठी वापर झाल्यास, त्यामध्ये असलेल्या रोगकारक जिवाणू, विषाणू किंवा परजीवींमुळे जठरांत्राशी संबंधित संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा संसर्गामुळे गस्ट्रो तसेच अतिसार, उलट्या, पोटदुखी, मळमळ यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात. त्यामुळे अश्या दूषित पाण्याच्या वापरामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने सदर ठिकाणी तातडीने पाहणी करून व्हॉल्वच्या चेंबरमध्ये साचलेले दूषित पाणी बाहेर काढावे, चेंबरमध्ये गाळ अथवा अन्य घाण साचली असल्यास ती पूर्णपणे साफ करावी, तसेच जलवाहिनी व व्हॉल्वची स्वच्छता व आवश्यक तपासणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा सुरू करण्यापूर्वी संबंधित चेंबरची स्वच्छता करून पाण्याच्या गुणवत्तेची खात्री करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे पाणीपुरवठा विभागाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
![]()

