पैलाड परिसरातील श्रीकृष्ण मंदिराजवळ टेम्पोने अचानक कट मारल्याचा प्रकार; चालकाचा शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील पैलाड परिसरात श्रीकृष्ण मंदिराजवळ अवैध वाळू वाहतुकीच्या संशयावरून टेम्पोचा पाठलाग करत असताना ग्राम महसूल अधिकारी अदिती संतोष जरे यांच्या दुचाकीला संबंधित टेम्पोने अचानक कट मारल्याची घटना शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता घडली. या प्रकारात जरे यांचा दुचाकीवरील ताबा सुटून त्या रस्त्यावर पडल्याने जखमी झाल्या. दरम्यान, टेम्पोचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाल रंगाचा वाळूने भरलेला टेम्पो शहरातून जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी अदिती जरे यांनी दुचाकीवरून त्याचा पाठलाग सुरू केला. पैलाड येथील श्रीकृष्ण मंदिराजवळ पोहोचल्यावर टेम्पोचालकाने पाठलाग करणाऱ्या अधिकाऱ्याला चकविण्याच्या प्रयत्नात अचानक कट मारल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जरे यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. या घटनेत त्यांना दुखापत झाली.
घटनेनंतर टेम्पोचालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने तेथून पलायन केले. संबंधित टेम्पोवर वाहन नोंदणी क्रमांक नसल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे चालकाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दखल घेतली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित टेम्पोचालकाचा शोध घेण्यासाठी डी.बी. पथक रवाना करण्यात आले आहे. चालकाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करताना महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. तसेच शहर व परिसरात वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने भरधाव वाहने आणि कारवाईपासून बचाव करण्याच्या प्रयत्नांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रभावी कारवाई करण्याबरोबरच कारवाई करणाऱ्या महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
![]()

