शहर मुस्लिम समाज कमिटीतर्फे डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक निकम यांच्यासह पोलीस पथकाचा गौरव…
प्रतिनिधी | अमळनेर : अमळनेर शहरात ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सव हे दोन्ही धार्मिक उत्सव शांतता, सलोखा व सामाजिक सौहार्दाच्या वातावरणात पार पडल्याबद्दल अमळनेर शहर मुस्लिम समाज शहर कमिटीतर्फे पोलिस प्रशासनाचा सत्कार करण्यात आला. यावेळी डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक निकम यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शहरातील विविध धार्मिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. ईद-ए-मिलाद तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केल्याने दोन्ही उत्सव शांततेत पार पडल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर अमळनेर शहर मुस्लिम समाज शहर कमिटीच्या वतीने पोलिस प्रशासनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक निकम तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्सवाच्या काळात केलेल्या बंदोबस्त व समन्वयाबद्दल कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. धार्मिक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सत्कार प्रसंगी शहर कमिटीचे अध्यक्ष नासिर हाजी, नगरसेवक मुख्तार खाटीक, माजी नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेवक नवीद शेख, आरिफ भाया, रज्जाक शेख, रियाज मौलाना, आसिफ भैय्या, राजू शेख, अलाउद्दीन, नईम पठाण, अफसर भाई यांच्यासह शहर मुस्लिम समाज कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
अमळनेर शहराची धार्मिक व सामाजिक सलोख्याची परंपरा कायम राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच आगामी काळातही विविध सण-उत्सव शांततेत आणि परस्पर सौहार्दाने साजरे करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
![]()

