अहिंसा, स्वातंत्र्य व ‘जय जवान, जय किसान’च्या विचारांना उजाळा; जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान…
प्रतिनिधी | अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती डि. आर. कन्या शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जयंतीनिमित्त शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियानही राबविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी होत्या. यावेळी उपमुख्याध्यापक एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी तसेच शिक्षकेतर प्रतिनिधी शाम पवार यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारांचा तसेच स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. गांधीजींनी स्वच्छतेला दिलेले महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, देशसेवा आणि ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेचे महत्त्व विशद करत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
जयंती कार्यक्रमानंतर शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
![]()

