शेतकरी अशोक भाऊराव पाटील यांच्या खळ्यातून पारडू उचलून नेल्याची माहिती; वनविभागाने पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील अंतुर्ली-रांजणे शिवारात बिबट्याने म्हशीचे पारडू उचलून नेऊन फस्त केल्याची घटना समोर आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी अशोक भाऊराव पाटील यांच्या खळ्यात बांधलेले म्हशीचे पारडू बिबट्याने उचलून नेल्याचे सांगण्यात येत असून, त्याचे अवशेष शिवारात आढळल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे का?, असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंतुर्ली-रांजणे परिसरातील शिवारात शेतकरी अशोक भाऊराव पाटील यांचे खळे आहे. त्यांच्या खळ्यात म्हशीचे पारडू बांधलेले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात वन्यप्राण्याने तेथून पारडू उचलून नेल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी पारडू दिसून न आल्याने परिसरात शोध घेतला असता त्याचा मागमूस शिवाराच्या दिशेने आढळून आल्याची माहिती आहे.
घटनेनंतर संबंधित परिसरात पाहणी केली असता पारडूचे अवशेष आढळल्याचे सांगण्यात येत आहे. पारडूवर हल्ला करून त्याला ठार केल्यानंतर त्याचा फडशा पाडण्यात आल्याचे प्राथमिक स्वरूपात सांगितले जात असले मात्र, हल्ल्याची पद्धत आणि आढळलेले अवशेष यामुळे हा हल्ला बिबट्याने केला असावा, अशी शक्यता शेतकरी व ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
- या घटनेमुळे अंतुर्ली-रांजणे शिवारातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. शेतीची कामे, पशुधनाची देखभाल तसेच रात्रीच्या वेळी शेतात जाणे यामुळे शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेची वनविभागाने तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी, मृत पारडूचा पंचनामा करावा आणि हल्ला बिबट्याने केला आहे की अन्य वन्यप्राण्याने, याची खातरजमा करण्यासाठी आवश्यक तपासणी करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच परिसरात बिबट्याचा वावर असल्यास त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात पुन्हा बिबट्याची दहशत?
अमळनेर तालुक्यात यापूर्वीही बिबट्याच्या वावराच्या चर्चा आणि निर्माण झालेल्या भीतीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अंतुर्ली-रांजणे शिवारातील या घटनेमुळे बिबट्याने पुन्हा परिसरात प्रवेश केला आहे का?? याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मात्र, वनविभागाच्या अधिकृत पाहणीनंतरच हल्लेखोर प्राणी कोणता होता, हे स्पष्ट होणार आहे.
![]()

