स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम; प्रवासी व नागरिकांना कचराकुंडी वापरण्याचे आवाहन…
प्रतिनिधी | अमळनेर : सेवा संकल्प अभियान व स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ अंतर्गत अमळनेर नगरपरिषद व लायन्स क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम व श्रमदान करण्यात आले. लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या मोहिमेत सहभागी झालेल्या नगरपरिषद कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी हातमोजे, मास्क व झाडूच्या सहाय्याने बसस्थानक परिसर, प्रवासी थांबे आणि बस उभ्या राहण्याच्या ठिकाणांची स्वच्छता केली. परिसरातील कचरा, प्लास्टिक व पालापाचोळा संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
उपक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ व नशामुक्त भारताची शपथ देण्यात आली. ‘चला करूया स्वच्छतेसाठी श्रमदान’ या संदेशातून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. बसस्थानक परिसरात दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असल्याने स्वच्छता राखण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच नागरिक, प्रवासी व व्यावसायिकांचीही असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी कचरा रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता उपलब्ध कचराकुंड्यांचा वापर करावा, तसेच स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी व प्रभाग मुकादम आदी उपस्थित होते. ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात आले असून, ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ या संकल्पनेतून नागरिकांनी स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले.
![]()

