तालुक्यातील १७ संघांचा सहभाग; विजयी संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड…
प्रतिनिधी | अमळनेर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर व तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शासकीय फुटबॉल स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, मारवाड रोड येथे उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत तालुक्यातील १७ संघांनी सहभाग घेतला. अनेक सामने अटीतटीचे होऊन अतिरिक्त वेळ व पेनल्टी शूटआउटपर्यंत रंगल्याने संकुल परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले.
स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर अर्बन बँकेच्या उपाध्यक्षा व खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त वसुंधराताई लांडगे, पोलिस अधिकारी व क्रिकेटपटू समाधान गायकवाड, अर्बन बँकेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अभिषेक पाटील, प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए. के. अग्रवाल, पोलिस अधिकारी मयूर पाटील व तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ यांच्या हस्ते फुटबॉल व मैदानाचे पूजन करून करण्यात आले. यावेळी पंचांचा तसेच गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
समाधान गायकवाड यांनी खेळाडूंनी मेहनत, शिस्त व सातत्याच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात यश मिळवून शासकीय सेवेत प्रवेश करावा व देशसेवेत योगदान द्यावे, असे आवाहन केले. वसुंधराताई लांडगे यांनी गीत सादर करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील निकाल : १४ वर्षे मुलांच्या गटात स्वामी विवेकानंद स्कूल, अमळनेर विजेता, तर सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, मंगरूळ उपविजेता ठरले. १४ वर्षे मुलींच्या गटात अॅड. ललिता पाटील इंग्लिश नॅशनल स्कूल, अमळनेर विजेता, तर स्वामी विवेकानंद स्कूल उपविजेता ठरले. १७ वर्षे मुलांच्या गटात सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल, मंगरूळ विजेता, तर स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेर उपविजेता ठरले. १७ वर्षे मुलींच्या गटात स्वामी विवेकानंद इंग्लिश नॅशनल स्कूल, अमळनेर विजेता, तर अॅड. ललिता पाटील इंग्लिश नॅशनल स्कूल उपविजेता ठरले. १९ वर्षे मुलांच्या गटात रॉयल उर्दू स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमळनेरने विजेतेपद मिळविले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गोकुळ बोरसे, सुनील करंदीकर, विनायक सूर्यवंशी, विनोद पाटील, योगेश पाटील, जय जाधव, सागर चावरिया, अर्शद शेख व दर्शन पाटील यांनी सहकार्य केले. विजयी संघांची १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान भुसावळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
![]()

