‘सफाई मित्र सुरक्षा अभियान’ अंतर्गत नमस्ते कार्ड, आयुष्मान भारत कार्ड व पीपीई किटचे वितरण…
प्रतिनिधी | अमळनेर : सेवा संकल्प अभियान व ‘स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६’ अंतर्गत अमळनेर नगर परिषदेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुरक्षा व कल्याणपर उपक्रम राबविण्यात आला. बुधवार, ३० सप्टेंबर रोजी नगर परिषदेच्या आरोग्य विभागात सफाई कर्मचाऱ्यांना नमस्ते कार्ड, आयुष्मान भारत कार्ड तसेच पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाचा उद्देश सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक आरोग्य सुविधा, सुरक्षा साहित्य व शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे हा होता. शहराच्या स्वच्छतेसाठी प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थितांना स्वच्छता शपथ तसेच ‘नशामुक्त भारत’ करण्याची शपथ देण्यात आली. स्वच्छ शहर, निरोगी कर्मचारी आणि सुरक्षित स्वच्छता व्यवस्था या उद्देशाने सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, सुरक्षा व सामाजिक कल्याणासाठी विविध उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास स्वच्छता निरीक्षक संतोष जाधव, संतोष माणिक, किरण कंडारे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी व शिपाई उपस्थित होते.
![]()

