१५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन; रस्ते, गटार, पथदिवे व निवासी दराने कर आकारणीची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील जपान जिन भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा १५ दिवसांनंतर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष सैय्यद अजहर अली यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जपान जिन हा निवासी भाग असूनही येथे औद्योगिक दराने कर आकारला जात असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर नियमित भरले जात असतानाही रस्ते, गटार आणि पथदिवे यांसारख्या प्राथमिक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात औद्योगिक दराने होणारी कर आकारणी रद्द करून निवासी दराने कर आकारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कच्च्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण, संपूर्ण भागात भूमिगत गटार योजना, आवश्यक ठिकाणी एलईडी व हायमास्ट पथदिवे बसविणे आणि आरक्षित मोकळ्या जागेचे अतिक्रमणापासून संरक्षण करून तेथे उद्यान व ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पावसाळ्यात कच्च्या रस्त्यांवर चिखल व खड्ड्यांची समस्या निर्माण होते, तर गटारीअभावी सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. परिसरातील अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
जपान जिन भागातील समस्यांबाबत २०२३ व २०२४ मध्ये निवेदने देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने १५ दिवसांच्या आत भागाची प्रत्यक्ष पाहणी करून मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे सैय्यद अजहर अली यांनी सांगितले.
यावेळी शराफत अली ढेकेदार, इकबाल लोहार, मोहसीन अली, इम्रान बागवान, सैय्यद आसिफ, शरूख शेख, शरूख पठाण, अबीद शेख, फौजन शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व जपान जिन भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनाची प्रत आमदार अनिल भाईदास पाटील, नगररचना विभाग आणि जिल्हाधिकारी, जळगाव यांना माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.
![]()

