इंदिरा गांधी भवन येथे आरोग्य तपासणी; सुरक्षितता व आरोग्यविषयक खबरदारीबाबत सफाई कामगारांना मार्गदर्शन…
प्रतिनिधी | अमळनेर: अमळनेर नगर परिषदेच्या वतीने सेवा संकल्प अभियान व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शहरातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी २९ सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी भवन येथे ‘सफाई मित्र सुरक्षा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. शिबिरात सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात सफाई कर्मचाऱ्यांना नियमित आरोग्य तपासणी, वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षितता साधनांचा वापर आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक आरोग्यविषयक खबरदारी घेण्याबाबत माहिती देण्यात आली.
शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्यात सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व कल्याणासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्याची भूमिका नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी व्यक्त केली.
शिबिरास आरोग्य सभापती, वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, शहर समन्वयक, विविध प्रभागांचे मुकादम, सफाई कर्मचारी तसेच नगरपरिषद दवाखान्यातील कर्मचारी उपस्थित होते. शिबिरामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
दरम्यान, अमळनेर नगर परिषदेच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियान व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातील विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीत नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.
![]()

