उत्कृष्ट नाट्यसादरीकरणाची दखल; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड…
प्रतिनिधी | अमळनेर : जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती अमळनेर शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. या कामगिरीमुळे शाळेच्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, तेथे हा संघ अमळनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल येथील रोटरी क्लब हॉलमध्ये करण्यात आले होते. स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील आठ शाळांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड, जिज्ञासा, संशोधनवृत्ती निर्माण करणे तसेच विज्ञानविषयक संकल्पना अभिनव व प्रभावी पद्धतीने मांडणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
स्पर्धेच्या प्रारंभी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी सौ. कविता सुर्वे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गणित-विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विज्ञान क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी अभिनय, सुसूत्र नाट्यसादरीकरण आणि विज्ञानविषयक संकल्पनांची परिणामकारक मांडणी केली. त्यांच्या सादरीकरणाची परीक्षकांनी दखल घेत संघाला तालुक्यात प्रथम क्रमांक देण्यात आला. या स्पर्धेसाठी भाऊसाहेब देशमुख व दिनेश नाईक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेनंतर त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विजयी संघात दिक्षिता भामरे, स्वरा कासार, विधी पाटील, परिणीती शिंदे, कुणाल बोरसे, प्रणाली सैंदाणे, पुष्करा राजपूत, मयंक राजपूत व आरुषी महाजन या विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या. विज्ञान शिक्षिका स्वाती माळी यांनी विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले. अभिनयातील बारकावे, नाट्यसादरीकरणाची पद्धत आणि विज्ञानविषयक संकल्पनांचे सखोल आकलन यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, डिंपल देसाई, प्रशांत वंजारी, व्ही. एस. अमृतकर, श्रावण पाटील, व्ही. पी. बडवे यांच्यासह शिक्षकवृंद व केंद्र कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमींकडून विजयी संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
![]()

