विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाची मुदत जवळ; नाव दुरुस्ती व नवीन मतदार नोंदणीची कामे वेळेत पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर: शहरातील इस्लामपुरा विभागातील यादी भाग क्रमांक १८३, प्रभाग क्रमांक १४ येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षणांतर्गत मतदार यादीतील नाव दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी तसेच संबंधित अर्जांची प्रक्रिया रखडल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाची निर्धारित मुदत जवळ येत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून नवीन बीएलओची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
इस्लामपुरा विभागासाठी विनीत कुलकर्णी यांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मतदार यादीतील नाव दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाशी संबंधित अर्जांसाठी नागरिक त्यांच्याकडे जात होते. मात्र, शिक्षकाची नोकरी सोडल्यामुळे बीएलओचे काम पुढे करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित विभागातील मतदार यादीविषयक कामकाजावर परिणाम झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विनीत कुलकर्णी हे लोकमान्य विद्यालय, अमळनेर येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या राजीनाम्याबाबत काही नागरिकांनी शाळेच्या प्राचार्यांची भेट घेतली असता, राजीनामा अर्ज शाळेला प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, सदर राजीनामा औपचारिकरीत्या स्वीकारण्यात आला आहे की नाही, याबाबत अधिकृत स्पष्टता उपलब्ध झालेली नसल्याने त्यांच्या बीएलओ पदाची सध्याची प्रशासकीय स्थितीही स्पष्ट झालेली नाही.
त्यामुळे विनीत कुलकर्णी यांची बीएलओ म्हणून नियुक्ती अद्याप प्रभावी आहे की नाही, ते पुढे हे काम पाहणार आहेत की नाही आणि त्यांच्याकडे प्रलंबित अर्जांची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पूर्ण केली जाणार, याबाबत संबंधित प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाची मुदत जवळ आल्याने मतदार यादीतील नाव दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी आणि इतर संबंधित अर्ज वेळेत निकाली निघण्याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे इस्लामपुरा विभागासाठी तातडीने बीएलओची सेवा उपलब्ध करून देऊन प्रलंबित कामे मुदतीपूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
विनीत कुलकर्णी हे बीएलओ म्हणून कार्यरत असतील तर त्यांच्या माध्यमातून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत. ते कार्यरत नसतील तर इस्लामपुरा विभागासाठी नवीन बीएलओची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत यापूर्वी तहसील कार्यालयात माहिती व निवेदने देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, अद्याप नवीन बीएलओबाबत स्पष्ट व्यवस्था झालेली नसल्याने प्रशासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यात आले आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक रामकृष्ण पाटील हेही उपस्थितीत, २८ सप्टेंबर रोजी इस्लामपुरा विभागातील रहिवासी व जबाबदार नागरिकांच्या वतीने प्रांताधिकारी तसेच अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे टपालाद्वारे लेखी अर्ज सादर करण्यात आला. या अर्जावर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या असून, अर्ज सादर करताना परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
![]()

