जातीवाचक शिवीगाळ व जुन्या वादातून संघर्षाचा आरोप; दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील भिलाली येथे २७ सप्टेंबरच्या रात्री जुन्या वादातून तसेच जातीवाचक शिवीगाळीच्या आरोपावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी एकूण २० जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. यातील १८ जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
प्रवीण पंडित घोडे यांच्या फिर्यादीनुसार, रात्री सुमारे आठ वाजता दोन युवक हरिजन समाजाबाबत द्वेषपूर्ण चर्चा करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत विचारणा केल्यानंतर शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास मंदिर परिसरात पोलीस पाटील व नागरिकांना बोलावण्यात आले. यावेळी काही युवकांनी जमाव करून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याचा तसेच घोडे कुटुंबातील इतर व्यक्तींनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ज्ञानेश्वर भारतसिंग गिरासे यांनी दिलेल्या दुसऱ्या फिर्यादीत वेगळी घटना नमूद करण्यात आली आहे. शौचालयावरून परतताना महादेव मंदिर चौकात गर्दी दिसल्याने आपण तेथे थांबलो. यावेळी प्रवीण घोडे व रवींद्र घोडे यांनी गर्दीतील चर्चेबाबत विचारणा केली. त्यानंतर जय भीम समाजाबाबतच्या वक्तव्यावरून शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचा आरोप गिरासे यांनी केला आहे. तसेच वंदना घोडे यांनी गचांडी पकडून धमकी दिल्याने आपण जखमी झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या फिर्यादीवरून प्रवीण घोडे, वंदना घोडे, रवींद्र घोडे, गिरीश कैलास पाटील, कैलास सुरेश माळी आणि गणेश दशरथ माळी यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते आणि मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गावात पुन्हा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून अधिकारी दिवसातून दोन वेळा गावाला भेट देत असल्याची माहिती आहे.
दोन्ही गुन्ह्यांचा तपास स्वतंत्रपणे सुरू आहे. पहिल्या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तर दुसऱ्या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी करीत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये गोटूसिंग दगा राजपूत, सुमित भाऊसाहेब गिरासे, ज्ञानेश्वर भारतसिंग गिरासे, हर्षल लोटनसिंग गिरासे, सुनील भगवान गिरासे, योगेश भारत गिरासे, रावसाहेब राजेसिंग गिरासे, अनिल भगवान गिरासे, राहुल विठ्ठल गिरासे, भाऊसाहेब निंबा गिरासे, छोटू दासभाऊ गिरासे, दीपक रूपसिंग गिरासे, नितीन गोटूसिंग गिरासे, विजय दरेसिंग गिरासे, गोविंद राजेसिंग गिरासे, भाऊसाहेब दासभाऊ गिरासे, दिलीप पदमसिंग गिरासे आणि राहुल वनेसिंग गिरासे यांचा समावेश आहे. दीपक रूपसिंग गिरासे आणि राहुल वनेसिंग गिरासे हे फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, परस्परविरोधी फिर्यादी आणि गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याने पोलिसांकडून दोन्ही बाजूंच्या तक्रारींच्या आधारे तपास केला जात आहे. घटनेचा नेमका घटनाक्रम आणि आरोपांची वस्तुस्थिती तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
![]()

