सप्टेंबरमध्ये संबंधित दुकानाला शासकीय गोदामातून धान्यपुरवठा न झाल्याचा दावा; पुरवठा विभागाकडून पोलिस बंदोबस्तात चौकशी…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील नगाव बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक एफपीएस १४९९११४००३१२ येथे लाभार्थ्यांचे पॉस मशीनवर अंगठे घेण्यात आले, मात्र प्रत्यक्षात धान्य वितरित झाले नसल्याची तक्रार समोर आली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर महिन्यात या दुकानासाठी शासकीय गोदामातून तांदूळ, मका, गहू किंवा ज्वारी यापैकी कोणत्याही धान्याचा पुरवठा झालेला नसल्याचे गोदामातील दप्तर व ऑनलाइन नोंदींच्या तपासणीत आढळल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणाची पुरवठा विभागाकडून चौकशी सुरू असून रात्री उशिरापर्यंत पोलिस बंदोबस्तात तपासणी करण्यात आली.
नगाव बुद्रुकच्या सरपंचांनी याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. दुकानदाराने चालू महिन्यात काही लाभार्थ्यांचे पॉस मशीनवर अंगठे घेतले, मात्र संबंधितांना रेशनचे धान्य मिळाले नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर विपुल किरणगीर गोसावी, मयूर अनिल बोरसे, सागर भरतगिर गोसावी, रोहिदास पंढरीनाथ वारुळे आणि सागर संजयगिर गोसावी यांनी गावकऱ्यांसह अधिकाऱ्यांकडे तक्रार करून धान्य न मिळालेल्या लाभार्थ्यांची यादीही सादर केली.
दरम्यान, तक्रारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय गोदामातील नोंदी तपासण्यात आल्याचे सांगण्यात आले. गोदाम व्यवस्थापक विशाल ठाकरे यांनी दप्तर व ऑनलाइन नोंदी तपासल्यानंतर सप्टेंबर महिन्यात नगाव येथील संबंधित दुकानासाठी कोणत्याही धान्याचा पुरवठा झालेला नसल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. संबंधित धान्य गोदामातच असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पॉस मशीनवरील नोंदी आणि प्रत्यक्ष धान्य वितरण याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख यांना दुकानाची तपासणी करण्याचे आदेश दिले. शेख यांनी नगाव येथे जाऊन लाभार्थ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. यावेळी तक्रारदार, दुकानदार आणि त्याच्या समर्थकांमध्ये गोंधळ झाल्याने चौकशीच्या कामात अडथळा निर्माण झाल्याची माहिती आहे.
यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे बंदोबस्ताची मागणी केली. एपीआय गणेश अहिरे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिस बंदोबस्तात दुकानाची तपासणी पुन्हा सुरू करण्यात आली.
उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी तक्रार प्राप्त होताच सखोल व पारदर्शक चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख यांच्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान काही लाभार्थ्यांनी पॉस मशीनवर अंगठा घेतला असला तरी त्यांना धान्य मिळाले नसल्याचे जबाबात सांगितले. काही लाभार्थ्यांनी दुकानदाराने नंतर धान्य देण्याचे सांगितल्याचेही नमूद केले आहे.
दरम्यान, धान्याचा साठा परस्पर हडप करण्याच्या तयारीचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. मात्र हा आरोप अद्याप सिद्ध झालेला नसून, प्रकरण पुरवठा विभागाच्या चौकशीअंतर्गत आहे. पॉस मशीनवरील नोंदी, प्रत्यक्ष धान्य वितरण आणि शासकीय गोदामातील पुरवठा नोंदी यांची पडताळणी झाल्यानंतरच या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. चौकशीच्या अंतिम अहवालाकडे नगावसह अमळनेर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
![]()

