सामाजिक कार्यकर्त्याचा अमळनेर पोलीस ठाण्यात अर्ज; संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी…
प्रतिनिधी | अमळनेर : तालुक्यातील हेडावे येथे घरासमोरील जुने झाड अर्धवट तोडल्याचा तसेच याबाबत जाब विचारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी हेडावे येथील सुशांत सुरेश ढिवरे (वय ३०) यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल करून संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, ढिवरे यांच्या घरासमोरील जुने व सावली देणारे झाड त्यांच्या कुटुंबातील सदस्य घराबाहेर असताना इजाज खा गुलताज खा (रा. साराबेटा, ता. अमळनेर) यांनी अर्धवट तोडल्याचा आरोप आहे. झाड अर्धवट अवस्थेत असल्याने ते घरावर कोसळून मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
झाड तोडले जात असताना गावातील काही नागरिकांनी संबंधित व्यक्तीकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर २८ सप्टेंबर २०२६ रोजी ढिवरे यांनी झाड तोडण्याबाबत संबंधित व्यक्तीकडे विचारणा केली. त्यावेळी आपल्याशी अरेरावीची भाषा वापरून जातीवाचक अपशब्दांचा वापर करण्यात आला तसेच जीवे मारण्याची व कुटुंबाला धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांनी तक्रारीत केला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्रातील वृक्षतोडीसंदर्भातील कायदे तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यानुसार, गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
दरम्यान, घटनेतील आरोपांची पोलीस प्रशासनाकडून चौकशी होणे अपेक्षित असून, बेकायदेशीर वृक्षतोडीच्या आरोपाबाबत पोलिस विभागाकडून कोणती कारवाई केली जाते, तसेच धमकी व जातीवाचक शिवीगाळीच्या तक्रारीवर अमळनेर पोलीस कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
![]()

