नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नादुरुस्त लिफ्टच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी…
अमळनेर | प्रतिनिधी : अमळनेर नगरपरिषद कार्यालयातील लिफ्ट मंगळवारी (दि. २९ सप्टेंबर) सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास अचानक बंद पडल्याने एक कर्मचारी काही काळ लिफ्टमध्ये अडकला. लिफ्ट अचानक बंद पडल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर दरवाजा उघडण्यात आला आणि त्याची सुखरूप सुटका झाली.
नगरपरिषद कार्यालयात विविध कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा होत असते. त्यामुळे कार्यालयातील लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लिफ्टचा वापर करणारे अन्य नागरिक यावेळी अडकले असते आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असती, तर संभाव्य दुर्घटनेची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नगरपरिषद कार्यालयातील लिफ्ट यापूर्वीही अनेकदा बंद पडल्याच्या तक्रारी असल्याचे सांगितले जात आहे. वारंवार तांत्रिक बिघाड होत असतानाही लिफ्टच्या दुरुस्ती व देखभालीबाबत आवश्यक ती कार्यवाही झाली आहे का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत.
वारंवार उद्भवणाऱ्या या प्रकाराची दखल घेऊन लिफ्टची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी, आवश्यक दुरुस्ती व नियमित देखभाल करावी आणि लिफ्ट नागरिकांच्या वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
![]()

