‘ग्रामीण पर्यावरणासाठी विज्ञान’ प्रकल्पाची जिल्हास्तरावर निवड; दिव्या पाटील व निधी पाटील यांच्या कामगिरीचे कौतुक…
प्रतिनिधी | अमळनेर : पंचायत समिती शिक्षण विभाग आणि बी. वाय. चौधरी माध्यमिक विद्यालय, शिरसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अमळनेर येथील श्रीमती डी. आर. कन्या शाळेने घवघवीत यश संपादन केले. ‘ग्रामीण पर्यावरणासाठी विज्ञान’ या विषयावरील प्रकल्पाने उच्च प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक पटकावला असून, या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
या प्रकल्पाचे सादरीकरण कु. दिव्या परमेश्वर पाटील आणि कु. निधी जगदीश पाटील या विद्यार्थिनींनी केले. त्यांनी निवड समितीसमोर प्रकल्पाची संकल्पना, मांडणी आणि कार्यपद्धती प्रभावीपणे स्पष्ट केली. त्यांच्या सादरीकरणाचे उपस्थितांनी कौतुक केले.
या यशाबद्दल उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार डॉ. उमा ढेकळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी विजेत्या विद्यार्थिनींना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी पी. पी. जोशी, शिक्षकेतर प्रतिनिधी शामभाऊ पवार, एस. एस. माळी, आर. एस. सोनवणे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
या प्रकल्पासाठी विज्ञान शिक्षिका एस. एस. कसबे यांच्यासह शाळेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, जिल्हास्तरीय प्रदर्शनातही त्या उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केला.
![]()

