दसरा मैदानावरील वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संस्थांना पोलिसांची परवानगी नाकारली; परंपरा खंडित होऊ नये म्हणून नगराध्यक्षांचा पुढाकार…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील दसरा मैदानावर रावण दहन करण्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी पवनपुत्र क्रीडा मंडळ आणि सुलक्ष्मी संस्था या दोन्ही संस्थांना रावण दहनाची परवानगी नाकारली आहे. दरम्यान, शहरातील रावण दहनाची परंपरा खंडित होऊ नये आणि श्रेयवादातून निर्माण झालेला वाद टाळता यावा, यासाठी नगरपरिषद प्रशासनातर्फे रावण दहन करण्याचा प्रस्ताव नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी मांडला आहे. यासंदर्भात १९ ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, सावतावाडीजवळील संत सखाराम महाराज मैदानात २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता सार्वजनिक रावण दहनाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमळनेर नगरपरिषदेच्या दसरा मैदानावर दरवर्षी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेकडून काही प्रमाणात खर्च केला जात असे, तर प्रत्यक्ष आयोजनाची जबाबदारी पवनपुत्र क्रीडा मंडळ पार पाडत होते. मात्र, यंदा सुलक्ष्मी संस्थेने नगरपरिषदेकडे अर्ज करून रावण दहनासाठी परवानगी मिळवल्यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला. परंपरेने आपणच हा कार्यक्रम करीत असल्याचा पवनपुत्र क्रीडा मंडळाचा दावा आणि परवानगी मिळवल्याच्या सुलक्ष्मी संस्थेच्या भूमिकेमुळे वादाला सुरुवात झाली. पुढे या प्रकरणाला राजकीय स्वरूपही प्राप्त झाले.
परिस्थिती चिघळू नये आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी उपविभागीय अधिकारी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दोन्ही गटांतील प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक घेतली होती. या बैठकीत दोन्ही संस्थांनी सामूहिकरीत्या रावण दहन करण्याबाबत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यानंतरही दोन्ही गटांकडून आपणच रावण दहन करणार असल्याचे संदेश प्रसारित होऊ लागल्याने वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली.
या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पवनपुत्र क्रीडा मंडळ आणि सुलक्ष्मी संस्था या दोघांना नोटिसा बजावल्या. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३६, ३८, ४० व ६८ तसेच जळगाव जिल्ह्यात लागू असलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(१) व ३७(३) अन्वये निर्बंधांचा संदर्भ देत दोन्ही संस्थांना रावण दहनाची परवानगी नाकारण्यात आली. या अंतर्गत वादाची चर्चा जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंतही पोहोचली होती.
दरम्यान, धार्मिक सण आणि सार्वजनिक उत्सव शहरात शांततेत व एकोप्याने साजरे व्हावेत, तसेच रावण दहनाची परंपरा खंडित होऊ नये, या उद्देशाने नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे. नगरपरिषदेकडून संपूर्ण खर्च करून प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार आणि नागरिकांच्या उपस्थितीत रावण दहन करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात १९ ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन पुढील निर्णय निश्चित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
![]()

