श्री स्वामी समर्थ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील घटना; धमकी दिल्याचाही आरोप, पोलिसांकडून पुढील तपास सुरू…
प्रतिनिधी | अमळनेर : टायपिंग क्लासला जाणाऱ्या तरुणीचा हात धरून तिला अंगावर ओढल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप असलेल्या सूरज नंदलाल पाटील (रा. कचरे) याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ तारखेला दुपारी दोन वाजेच्या सुमारास श्री स्वामी समर्थ मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमारे दोन महिन्यांपूर्वी संबंधित तरुण आणि पीडित तरुणी एकाच स्पर्धा परीक्षा वर्गात शिकत होते. त्या वेळी तरुणीने नोट्स घेतल्या असताना संबंधित तरुणाने तिला आपण आवडत असल्याचे सांगून संबंध ठेवण्याचा आग्रह धरल्याचा आरोपही तिने तक्रारीत केला आहे.
१३ तारखेला अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातून तरुणी टायपिंग क्लाससाठी येत असताना संबंधित तरुण मोटारसायकलवरून तिच्याजवळ आला. त्याने तिच्याशी प्रेमसंबंध ठेवण्याचा आग्रह धरत तिचा उजवा हात पकडून तिला स्वतःकडे ओढल्याचा आरोप आहे. तसेच, यापुढे कुठेही भेटल्यास तुला सोडणार नाही, अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तरुणीने हात सोडला नाही तर आरडाओरड करण्याचा इशारा दिल्यानंतर संबंधित तरुण तेथून निघून गेल्याचे तिने सांगितले.
घटनेनंतर तरुणी घरी गेली आणि तिने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल विनोद भोई पुढील तपास करीत आहेत.
![]()

