भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका; लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर…
प्रतिनिधी | अमळनेर : शहरातील कसाली मोहल्ला परिसरात भरधाव वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला असून, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी परिसरातील योग्य ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका परिसरातील नागरिकांसह मान्यवरांनी घेतली आहे.
कसाली मोहल्ला परिसरातून दिवसरात्र वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र, रहिवासी क्षेत्रातूनही काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना तसेच परिसरातून ये-जा करताना अपघाताचा धोका जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर रिजवान मन्यार, नईम पठाण, अमजद मेवाती, नविद पठाण, इकबाल हलवाई, करीम शेख, जुबेर पठाण, केफ पठाण यांच्यासह परिसरातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक त्या ठिकाणांची पाहणी करावी आणि नियमानुसार तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
![]()

