३ वयोगटांत ३२ संघांतील सुमारे २५० खेळाडूंचा सहभाग; चुरशीच्या सामन्यांनी रंगत वाढली…
प्रतिनिधी | अमळनेर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर आणि जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय तालुकास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. अमळनेर तालुक्यातील 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या एकूण 32 संघांतील सुमारे 250 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेदरम्यान अटीतटीचे व चुरशीचे सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची उपस्थिती होती.
स्पर्धेचे उद्घाटन जळगाव जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे सचिव तथा एरंडोल विभागाचे क्रीडा सचिव प्रा. डॉ. देवदत्त पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धनदाई एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी सौ. प्रमिला दत्तात्रेय पाटील, प्रा. डॉ. नयना कैलास पाटील, डी. आर. कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, प्रा. सौ. निशा शैलेंद्र पाटील, धनदाई कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. प्रा. जयवंत पाटील, अमळनेर तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ आणि कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. शैलेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी मेजर ध्यानचंद व बजरंगबली यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून, श्रीफळ वाढवून तसेच मैदान व हॉलीबॉलची पूजा करून स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे तसेच क्रीडा शिक्षकांचे प्रा. प्रितेश तुरणकर आणि श्री. स्वप्निल पाटील यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले.
सौ. प्रमिला पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत व सातत्याने सराव करण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. नयना पाटील यांनी खेळाडू शिस्तप्रिय व मेहनती असतो, असे सांगितले. मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी विविध संधी उपलब्ध होत असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
उद्घाटक प्रा. डॉ. देवदत्त पाटील यांनी शालेय क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले. या संधीचे योग्य प्रकारे रूपांतर करून कष्ट व मेहनतीच्या जोरावर देशाचा मान-सन्मान वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धेतील 14 वर्षांखालील मुलांच्या गटात ग्लोबल स्कूलने विजेतेपद मिळविले, तर स्वामी विवेकानंद स्कूल उपविजेता ठरले. याच वयोगटातील मुलींच्या गटात शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे विजेते ठरले असून स्वामी विवेकानंद विद्यालयाने उपविजेतेपद मिळविले.
17 वर्षांखालील मुलांच्या गटात साने गुरुजी विद्यालयाने विजेतेपद मिळविले, तर ललिता पाटील स्कूल उपविजेता ठरले. मुलींच्या गटात शारदा विद्यालय, कळमसरे विजेते आणि स्वामी विवेकानंद विद्यालय उपविजेते ठरले. 19 वर्षांखालील मुलांच्या गटात प्रताप कॉलेजने विजेतेपद पटकावले, तर जय योगेश्वर विद्यालय उपविजेते ठरले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आर. ए. घुगे, आर. एस. सोनवणे, विनायक सूर्यवंशी, जे. व्ही. बाविस्कर, जयेश मासरे, सागर चावरीया, एस. वाय. करंदीकर, मयूर बारस्कर, के. आर. बाविस्कर, महेंद्र पारधी, आर. ए. पवार, हेमंत जाधव, योगेश पाटील, कृष्णा तुरे, राजेंद्र देशमुख, आदित्य राज पाटील, राजेश राठोड, केदार देशमुख, ज्ञानेश्वर महाजन, मुनाफ तडवी आदी क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.
![]()

